TALKS RundUmschau भारतीय भाषावकाश व भाषांतरे
mr de

भारतीय भाषावकाश व भाषांतरे

भारत हा एक खंडप्राय देश. भारतीय भाषांची आकडेवारी पाहू जाता १६५२ भाषानामे सापडतात आणि आजमितीला भारतीय राज्यघटनेच्या आठव्या अनुसूचीत संस्कृत ही विदग्ध भाषा धरून एकूण २२ भाषा महत्त्वाच्या म्हणून नोंदविल्या गेल्या आहेत. बहुभाषिता हे भारताच्या सांस्कृतिक बहुविधतेचे म्हणजेच वैभवाचे द्योतक आहे. प्राकृत, पाली, अर्धमागधी, फारसी आणि अरबी ह्याचबरोबर हिब्रू, लॅटिन ह्या धर्मग्रंथाच्या भाषा आणि पोर्तुगीज, फ्रेंच, जर्मन अशा परकीय भाषांचे अध्ययन इथे गेली काही शतके होते आहे. ह्या व्यामिश्रतेशिवाय बोलीभाषा, मौखिक परंपरा, लोकधारा  हे भारतीय वाङ्मयविश्वाचे महत्वाचे अंग आहे.  इंग्रज भारतात आल्यावर आधुनिक विचार व प्रबोधनवादी दृष्टिकोन येथे रुजला आणि त्यातून भारतातील सर्वच प्रादेशिक भाषांतील साहित्याने एक आधुनिक वळण घेतले. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर एक विशेष अस्मिता जागृत होऊन एक स्वयंभू अभिव्यक्ती मूळ धरू लागली.

भारत  ह्या भाषाबहुल देशाच्या साहित्यशास्त्रात भाषांतर ही संकल्पनाच  मांडली गेलेली नाही. भाषांतर, भाष्यांतर, अनुवाद, अनुसर्जन, अनुप्रस्तुती, रूपांतर, पुनर्कथन अगदी अपभ्रंश इतकी विविध नामाभिधाने ह्या एका प्रक्रियेला आहेत आणि प्रत्येक संकल्पनेच्या  केंद्रस्थानी वेगळी तात्त्विक बैठक आहे.

स्वतंत्र भारतात विविध सरकारी पुरस्कार, अकादमीज् आणि इतर योजनांद्वारे भारतीय भाषांतील अन्योन्याश्रयी भाषांतरास प्रोत्साहन दिले जाते खरे, पण दोन भारतीय भाषांतील भाषांतरासाठी लागणारी संवेदनशीलता, भाषिक  गुणवत्ता, सांस्कृतिक ताणेबाणे समजून घेण्याची अभ्यासू वृत्ती असलेले भाषांतरकार आजही पुरेशा प्रमाणात उपलब्ध नाहीत. तत्त्वतः इंग्लिश भाषा हीच भाषांतर क्षेत्रात मूर्धन्य आहे. ह्याच भाषेच्या पुलावरून दोन भारतीय भाषांचा संवाद घडून येतो. अगदी, दोन भारतीय भाषांमधील भाषांतर हे  बहुतांशी इंग्लिश भाषांतराच्या आधाराने केले जाते.  साहित्याच्या बाजारातही  इंग्लिश भाषांतरांना जास्त उठाव आहे. जागतिक पातळीवर भारतीय साहित्याची दखल घेतली जावी असे वाटत असेल, तर इंग्लिश भाषांतराचा मार्ग चोखाळणे अपरिहार्य आहे.

गीतांजली श्री ह्यांच्या मूळ हिंदी कादंबरीचे तितकेच रसाळ आणि अर्थवाही रूपांतर बुकर पारितोषिक मिळवून गेले, त्यानंतर भारतीय भाषांतरक्षेत्रात आज नवी ऊर्जा सळसळत आहे. पण ह्या ऊर्जेची गंगोत्री सापडते जयपूर लिटरेचर फेस्टिवल ह्या भारतस्थित  नेत्रदीपक शब्दसोहळ्यात.

२०१८ साली ह्या मंचावर जे सी बी ह्या पुरस्काराचा श्रीगणेशा झाला, भारतीय साहित्यातला हा सर्वोच्च गौरव म्हणजे  बुकरचा समकक्ष.  ह्या पुरस्काराचे मानधन ₹2,500,000 (US $ 31,000)इतके आहे.  ह्या पुरस्काराने प्रथमच भारतीय अँग्लोफोन लेखन आणि भारतीय भाषांतील साहित्याची इंग्लिश भाषांतरे ह्यांना समतुल्य मानले, ही  एक आश्वासक आणि स्वागतार्ह सुरुवात  होती. त्यामुळे भाषांतराला जणू नवसंजीवनी मिळाली. 

२०१८ च्या अंतिम यादीतील पाच पुस्तकांपैकी दोन भाषांतरे होती. त्या वर्षी बेन्यामिनच्या मल्याळम कादंबरीला पुरस्कार प्राप्त झाला. जे सी बी साठी अंतिम यादीत तर इंग्लिश भाषांतरे सातत्याने निवडली जात आहेतच, पण २०२० व २०२१ सालीही भारतीय भाषांतील पुस्तकांच्या  इंग्लिश भाषांतरांना ह्या पुरस्काराने गौरविले गेले होते. २०२२ साली तर  हिंदी, उर्दू, नेपाळी, बांगला आणि मल्याळम ह्या भाषांतील कादंबऱ्यांची केवळ  इंग्लिश भाषांतरेच पुरस्काराच्या अंतिम यादीत होती. भारतात सध्या कोणते व्यवच्छेदक साहित्यविषय अग्रणी आहेत, हे जाणून घेण्यासाठी ह्या पुस्तकांवर धावती नजर टाकू या. 

ह्या पाच पुस्तकांपैकी द पैराडाइज ऑफ फूड (उर्दू, खालिद जावेद, भाषांतर: बरन फारूकी) ही  पारितोषिकविजेती कादंबरी मुदपाकखान्याचे  रूपक वापरून गुड्डू मियाँ नामक व्यक्तीचा  ५० वर्षांचा जीवनालेख मांडते. भारत आणि इस्लामिक संस्कृतीच्या परिघातली एकत्र कुटुंबातील  वाटचाल आणि सामाजिक भवतालातील घडामोडी ह्यांची घट्ट वीण घालणारी ही Bildungsroman आहे. 

सॉन्ग ऑफ द सॉइल (नेपाळी, चुडेन काबिमो, भाषांतर:अजीत बराल) ह्या कादंबरीत १९८०च्या दशकातील  गोरखालँडच्या स्वतंत्र राज्याच्या मागणीसाठीच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवरची कथा वाचायला मिळते. . संघर्ष, लढा, हिंसाचाराचे अनेक नृशंस चेहरे इथे अनावृत होतात. ही सुद्धा एका अर्थी Bildungsroman आहे. 

इमान (बांगला, मनोरंजन ब्यापारी, भाषांतर: अरुणव सिन्न्हा) मध्ये तान्हा इमान खुनी आईच्या कुशीत बसून तुरुंगात येतो, सुधारगृहात जातो, मग जादवपूर रेल्वे स्टेशनवर कचरा वेचून उदरनिर्वाह करू लागतो.  बाहेरच्या असुरक्षित जगात त्याचा जीव घुसमटू लागल्यावर तो  तुरुंगाच्या सुरक्षित दुनियेत परत जाऊ पाहतो. सर्वसामान्यांच्या सामाजिक भवतालाचे, त्यांच्या निरस, अर्थहीन वास्तवाचे पदर उलगडणारी ही कादंबरी. बांगला साहित्यातील मानवतावादाचे हे पूर्णतः नवीन आवर्तन आहे.    

वल्ली (मल्याळम, शीला टॉमी, भाषांतर: जयश्री कलाथिल) - लोककथांचे नंदनवन असलेल्या प्राचीन निसर्गसंपन्न वायनाड मधील काही आदिवासी पिढ्यांची वल्ली ही दूरगामी कथा - त्यांच्या पिळवणुकीची, अत्याचारांची आणि त्यांच्या कणखर  प्रतिकाराची,  धगधगत्या बंडखोरीची.   

टूम्ब ऑफ सॅण्ड (हिंदी, गीतांजलि श्री, भाषांतर: डेझी  रॉकवेल)  उत्तर भारतातली ऐंशी वर्षांची स्त्री पतीच्या मृत्यूनंतर आयुष्याचा नवा अध्याय सुरु करण्यासाठी निकराने तयार होते. परंपरा आणि रीतीभातींना आव्हान देते, एका पारलैंगिक व्यक्तीशी मैत्री करते. एक आई,  मुलगी, स्त्री, स्त्रीवादी असणं म्हणजे नक्की काय ह्याचं नव्याने मूल्यमापन करण्यासाठी ती निघाली आहे. देश, सीमा, सरहद्द, लिंगभेद, धर्म ह्या शब्दांचे व्यापक अर्थ शोधत.

ह्या पाच पुस्तकांच्या कथानकात समकालीन भारतीय साहित्याचे प्रातिनिधिक प्रतिबिंब पाहायला मिळते. गावगाड्याच्या परिघाबाहेर जगणाऱ्या आणि भारतीय समाजव्यवस्थेच्या वळचणीला आयुष्य कंठणाऱ्या अगणित शोषितांचा आवाज गेली काही दशके आता कणखर झाला आहे, अन्यायाला वाचा फोडली जाते आहे, भारतीय स्त्रियांचा संघर्ष अनेक पातळ्यांवरचा आहे. अनुकरण, बंडखोरी / विद्रोह व आत्मशोध हे त्यांच्या लेखनाचे तीन टप्पे मानता येतात. समकालीन सामाजिक वास्तवाच्या दृष्टीने आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक वास्तवाचा, इतिहासाचा, प्रगती आणि बदलांचा आलेख अनेक पुस्तकांत सविस्तर मांडलेला दिसतो.

आजमितीला  भारतीय तसेच आंतरराष्ट्रीय लेखकांमधील संपर्क सुलभ होऊन वाचकांतील विचक्षणा, आकलन, संवेदनशीलता आणि परिशीलनही वाढले आहे.तरीही, भारतात एकुणात भाषांतराला ऊर्जितावस्था आली आहे ह्या गोड भ्रमात कुणी राहू नये. अजूनही भाषांतराच्या आधारे मूळ लेखनाची कथावस्तू, सहकालीनता, मांडणीतील नावीन्य, प्रतिमाविश्व, संदर्भबहुलता आणि भाषासौष्ठव ह्या निकषांवरच  पारितोषिक दिले जाते, भाषांतराची समीक्षा व परीक्षण ह्यांवर आधारित पुरस्कार जोवर दिले जात नाहीत, तोपर्यंत भाषांतर ही साहित्यकृती म्हणून पूर्णत्वाला पोहोचणार नाही, भाषांतर ही अनुकृती भारतात अजूनही केवळ संपर्क आणि संवाद सुकर करण्यासाठी एक दुवा, एक संलग्न साधन म्हणून साहाय्यकारी ठरते आहे.

13.07.2023
PDF

जयश्री हरि जोशी: जन्म पुणे, भारत. अवगत भाषा: . संस्कृत, हिंदी, मराठी, इंग्लिश, जर्मन

जर्मन साहित्य आणि  भारतीय नाट्य, साहित्य ह्यांचा तुलनात्मक अभ्यास. 

अनुवाद: नाटके, कविता, कथा, कादंबरी, कुमारसाहित्य. 

रिल्कं, एरिश फ्रीड, हिल्डं डोमिन, माशा कालेको, झैद, अली अब्दोल्लाही, उलरिकं ड्रेस्नर, रोलांड शिमेलफेनीश,  साशा स्टानिसीच् इत्यादि. 

ग्योथे इन्स्टिट्युट मॅक्स म्युलर भवन ह्या जर्मन सांस्कृतिक संस्थेत कार्यरत. 

भाषांतर प्रकल्प समायोजन: काव्य, नाटक, निबंध: जर्मनमधून दक्षिण भारतीय भाषांत. 

मराठीत कवितालेखन आणि ललितबंध. नियतकालिके आणि वर्तमानपत्रांत साहित्यविषयक लेखन.

Verwandte Artikel
13.07.2023
RundUmschau#04
13.07.2023
A New Translation Manifesto Calls for Change